धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील मुख्य मेन रोडवरील आझाद चौक परिसरात भाजी विक्रेते, व्यापारी तसेच काही शेतकरी यांनी थेट रस्त्यावरच आपले दुकान मांडल्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजीपाला विक्री सुरू असल्याने वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर सतत कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या भागातून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच सार्वजनिक वाहने जात असताना रस्त्याच्या मध्यावरच भाजी बाजार भरत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकदा वाहनचालक आणि पादचारी यांच्यात वादही होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या समस्येकडे नगरपालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील मुख्य चौकातच अशी परिस्थिती असताना संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

प्रश्न असा उपस्थित होत आहे की, एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? वाहतूक शाखा आणि नगरपालिका प्रशासन तेव्हा जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर भरलेला हा अनधिकृत भाजी बाजार हटवून वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 
Top