धाराशिव (प्रतिनिधी)- आय.डी.ए. धाराशिव शाखेच्या वतीने जागतिक दंतवैद्यक दिनाचे आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी दंतवैद्यकांचा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 40 वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा देणाऱ्या क्षेत्रातील महामेरूंचा सन्मान करण्यात आला.
जो संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला. भीष्म पितामहांचा गौरव दंतवैद्यकीय क्षेत्रातील स्तंभ मानले जाणारे डॉ. अजित नायगावकर (धाराशिव), डॉ. बी. ए. कठारे (धाराशिव), डॉ. गोपाळ हंबिरे (बार्शी), डॉ. सुरेश चव्हाण (उमरगा) आणि डॉ. दिलीप दडपे (कळंब) या 40 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या ज्येष्ठ तज्ज्ञांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा नवीन पिढीला व्हावा, हा या मागचा मुख्य उद्देश होता.
20 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान
तसेच 20 वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या डॉक्टरांचाही यावेळी गौरव झाला. यामध्ये धाराशिवचे डॉ. संदेश गांधी, डॉ. धनंजय गवळी, डॉ. अभिजीत नायगावकर, डॉ. अजित बुरगुटे, तुळजापूरचे डॉ. जयेंद्र जहागीरदार, कळंबचे डॉ. अभय मनगिरे, डॉ. श्रीहरी मुळे, डॉ. अमित पाटील, डॉ. अविनाश तांबारे, नळदुर्गचे डॉ. संतोष शेळके, वाशीचे डॉ. उमाशंकर विश्वेकर आणि उमरग्याचे डॉ. संतोष चव्हाण, डॉ. नजीर शेख, डॉ. यतिराज बिराजदार यांचा समावेश होता.
महिला शक्तीचा जागर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दंतवैद्यकीय क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक काळ अग्रेसर असलेल्या महिला डॉक्टरांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये धाराशिवच्या डॉ. दिपाली रामढवे आणि लोहाऱ्याच्या डॉ. मयुरी अकोसकर-गारठे यांचा सत्कार करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
हा सोहळा आय.डी.ए. धाराशिव शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रतीक शेटेआणि सचिव डॉ. रोहन झाडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. विशाल सारडा आणि डॉ. संजीवनी जाधवर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आय.डी.ए. कमिटीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. धाराशिव जिल्ह्यातील दंतवैद्यकीय क्षेत्रातील ही एकजूट आणि उत्साह पाहून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.