धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव येथे दि.28 मार्च 2026 रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करत शाळा व पालक यांच्यातील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.

वर्गशिक्षक वैभव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यास, शिस्त व वर्तनाविषयी पालकांशी संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी पालकांनीही आपले अभिप्राय व सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक के.बी. घोडके, उपमुख्याध्यापक बी.के. कुंभार यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांचा समन्वय अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव धनंजय आप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालक व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

 
Top