परंडा (प्रतिनिधी)-  परंडा-सोनारी रोडवरील खानापूर पाटीजवळ शनिवार, दि.28 रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वार आश्रुबा मांडवे (रा. कुक्कडगाव, ता. परंडा) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.धडक इतकी जोरात होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, या घटनेमुळे कुक्कडगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रुबा मांडवे हे आपल्या मोटारसायकल (क्र. एमएच 25 बीसी 9079) वरून एकटेच परंड्याकडे येत होते. दुपारी 2:20 च्या सुमारास ते खानापूर पाटीजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. संबंधित टेम्पोचे मालक गोविंद वाघ (रा. राळेसांगवी, ता. भूम) हे परंड्याकडून नान्नजजवळ कलिंगड भरण्यासाठी जात होते. अपघाताची भीषणता इतकी होती की समोरासमोर झालेल्या या धडकेत दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. धडक बसल्यानंतर मांडवे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आणि क्षीरसागर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अपघातास कारणीभूत ठरलेला आयशर टेम्पो आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील तपास परंडा पोलीस करीत आहे.


 
Top