धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते,तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे.पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

मृत व जलसंधारण विभाग धाराशिव व मृत व जलसंधारण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त वतीने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपूर्णतः अभियान 2.0 अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून पुजार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जल योद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मदने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  कटकधोंड,धाराशिव सारथी जि प शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गोडसे व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या मार्गदर्शक वैशाली घुगे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात दर तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे धरणे, कालवे, बंधारे यांसारख्या प्रकल्पांबरोबरच स्थानिक स्तरावर पाणी साठवणूक आणि पुनर्भरणावर भर देणे आवश्यक आहे.  डॉ.घोष म्हणाले की, मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा दुष्काळी स्वरूपाचा असून 2024 मध्ये अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. अशा परिस्थितीत दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यावेळी केंद्रे, गोडसे, घुगे यांचेही मार्गदर्शन झाले.  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जल पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमास जिल्ह्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय जलसंधारण अधिकारी सायली जाधव यांनी केले.


 
Top