धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना,शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. दैनंदिन कामकाजातील ताणतणावातून मुक्तता मिळून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी पुजार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सर्वश्री.ओंकार देशमुख,रेवैयाह डोंगरे,दत्तू शेवाळे तसेच तहसीलदार मृणाल जाधव,अरविंद बोळगे, गोविंद येरमे,जयवंत पाटील,निलेश काकडे,प्रकाश म्हेत्रे,हेमंत ढोकले आणि रणजितसिंह कोळेकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये 100 मीटर व 200 मीटर धावणे,लांब उडी,उंच उडी, थाळी फेक,भाला फेक,गोळा फेक, 3 किमी चालणे यांसारख्या मैदानी स्पर्धांसह क्रिकेट,व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, बॅडमिंटन, रिंग टेनिस, खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम व टेबल टेनिस अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला आहे.
