धाराशिव (प्रतिनिधी)- श्री राम जन्मोत्सवानिमित्त धाराशिव शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील कसबा भागातील श्री राम मंदिर आणि समर्थ नगरमधील राम मंदिर येथे भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
राम जन्मोत्सवानिमित्त धाराशिव शहरातील प्रमुख चौकात श्री राम जन्मोत्सव भाजपाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबिर समर्थ नगर येथील राम मंदिरात घेण्यात आले. समर्थ नगर मधील राम मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. दुपारी 12 च्या दरम्यान महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. धाराशिव तालुक्यातील तडवळा येथे श्री राम यांचे पुरात्न मंदिर असून, या ठिकाणीही भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भूममध्ये भव्य शोभायात्रा
प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भूम शहरातील शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरातून प्रभू श्रीराम व बजरंगबली हनुमान यांच्या आरतीने भव्य शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. धार्मिक वातावरण, पालखी,भगव्या पताका, ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण भूम शहर भक्तिमय झाले होते. शिवाजीनगर येथून सुरू झालेली ही शोभायात्रा फ्लोरा चौक, ओंकार चौक, नागोबा चौक, गांधी चौक, जुनी वेस मार्गे कसबा येथील प्रभू श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत शोभायात्रेचे स्वागत केले.
यावेळी बाळासाहेब क्षिरसागर, ज्ञानेश्वर गिते, संतोष सुपेकर, बाबासाहेब वीर, आबासाहेब मस्कर, हेमंत देशमुख, अमर सुपेकर, निलेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व भूम शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेच्या निमित्ताने शहरात भक्ती, एकता आणि सामाजिक सलोखा यांचे दर्शन घडले असून प्रभू श्रीरामांच्या आदर्श विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


