धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, बेंबळी जवळील शिवाजीनगर परिसरात बोलेरो पिकअप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धाराशिव शहरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले वाजिद पठाण वय 57 यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वाजिद पठाण लातूरहून मोटरसायकलवरून बेंबळी मार्गे धाराशिवकडे येत असताना समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाजिद पठाण यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, अपघाताची तीव्रता लक्षात घेता त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.
