धाराशिव (प्रतिनिधी)- आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यासमोर आता नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कच्च्या मालाच्या, विशेषतः धातूंच्या किमतीत जागतिक स्तरावर होत असलेल्या सततच्या बदलांमुळे शेतीसाठी लागणाऱ्या 'पंप संचांच्या' किमतीत ७.५ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बळीराजाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पीव्हीसी पाईपनंतर आता डिझेल-खतांपाठोपाठ 'पंप संच'ही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाचे वाढत्या खर्चाचे गणित कोलमडणार आहे. 'दक्षिण भारत इंजिनीअरिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापासून या दरवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरात तांब्याच्या किंमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. प्रति किलो ९०० ते ९५० रुपये असलेले तांबे आता १२०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. पंप संचाच्या एकूण उत्पादन खर्चामध्ये तांब्याचा वाटा २५ ते ३० टक्के असतो. याशिवाय ॲल्युमिनियम, पोलाद आणि कास्ट आर्यनच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने पंप उत्पादक कंपन्यांना ही दरवाढ करणे भाग पडत आहे.

धाराशिवच्या शेतकऱ्यांवर दुहेरी ओझे पडण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात सिंचनासाठी विहिरी आणि कूपनलिकांवर अवलंबून असतो. जिल्ह्यात पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सबमर्सिबल आणि इलेक्ट्रिक पंपांचा वापर केला जातो. आता १० टक्क्यांची वाढ झाल्यास, एका सामान्य पंपासाठी शेतकऱ्याला ३ ते ५ हजार रुपये जास्तीचे मोजावे लागतील. त्यातच पाइप आणि वायरही महाग झाले आहे. केवळ पंपच नाही, तर त्यासोबत लागणारे पाइप आणि केबल्सच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण पंप संचाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी पंप उत्पादक संघटनांनी केंद्र सरकारकडे साकडे घातले आहे. सध्या पंप संचांवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो, तो ५ टक्क्यांपर्यंत खाली आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर करात कपात झाली, तरच वाढत्या महागाईपासून सामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळू शकेल.



दरवाढ अटळ : संजय मंत्री

कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्याने एमएसएमई (MSME) क्षेत्रातील छोटे पंप उत्पादक अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहेत. ही दरवाढ न केल्यास उत्पादन बंद पडण्याची भीती भारतीय पंप उत्पादक संघटनेचे अध्यक्ष के. व्ही. कार्तिक यांनी दिली असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांनी दिली आहे.

 
Top