धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानला जाणारा ‘ईद-मिलन’ कार्यक्रम यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. ‘जमात-ए-इस्लामी हिंद’, धाराशिव शाखेच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने आज, शुक्रवार २७ मार्च रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जमात-ए-इस्लामी हिंद संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.
शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्स मधील समर्थ मंगल कार्यालय येथे सायंकाळी ७:१५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र आणून परस्परांमधील बंधुभाव वृद्धिंगत करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अहमदनगर येथील प्रख्यात विचारवंत डॉ. इकराम खान काटेवाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि पाटोदा (जि. संभाजीनगर) येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद जमात-ए-इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष सजीयोद्दीन शेख भूषवणार आहेत.शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी, मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.