धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नीच्या निर्घृण खून प्रकरणात दोषी असलेल्या पतीला जन्मठेप व 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. धाराशिव ओके सर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 25 मार्च 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनदूर (ता. तुळजापूर) येथील फिर्यादी खलील शेख यांची बहिण सुलताना हिला तिचा पती वाहिद बिलाल कुरेशी याच्याकडून चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार छळ व मारहाण होत होती. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. यापूर्वीही वाद वाढल्याने सुलताना काही दिवसांसाठी हैदराबाद येथे नातेवाईकांकडे गेली होती. नंतर नातेवाईकांच्या समजुतीनंतर ती पुन्हा पतीसोबत राहू लागली होती. दरम्यान, 5 नोव्हेंबर 2024 रोजी नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यासमोरील चहाच्या टपरीवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद अचानक हिंसक वळण घेत आरोपी वाहिद कुरेशी याने हातातील चाकू व कात्रीच्या सहाय्याने सुलतानावर सपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली व जागीच मृत्यूमुखी पडली. घटनेदरम्यान आरोपीने स्वतःच्या पोटावर व गळ्यावरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचवण्यात आला. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 351 (2), (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चाकू, कात्री तसेच रक्ताचे नमुने जप्त केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. पी. सोळुके यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने एकूण 12 साक्षीदार तपासले. यामध्ये बाल साक्षीदाराची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तो ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी आरोपी वाहिद कुरेशी (वय 38) यास दोषी ठरवत जन्मठेप व 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवीचे काम पोलीस अंमलदार संजय जटे यांनी पाहिले.