धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून दोन निष्पाप मुलींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.बालविवाह आणि कौटुंबिक त्रासाच्या विळख्यात अडकलेल्या या मुलींना मुक्त करून त्यांना नव्या आयुष्याची दिशा देण्यात आली आहे.या मुलींची शक्ती सदन येथे रवानगी करण्यात आली असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
धाराशिव तालुक्यातील एका गावातील शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलीने तिच्या आईने तिच्या व वडिलांच्या इच्छेविरुद्ध लावलेल्या बालविवाहाविरोधात धाडसाने आवाज उठवला.शिक्षण बंद करून मारहाण केली जात असल्याची वेदनादायक कहाणी तिने 13 मार्च 2026 रोजी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्जाद्वारे मांडली. हा अर्ज मिळताच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव भाग्यश्री पाटील यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली.
या प्रकरणासाठी बालस्नेही संघातील उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दोन्ही मुलींची व्यथा समजून घेतली. चौकशीदरम्यान पीडित मुलीने लग्नातील फोटो आणि मारहाणीचे व्हिडिओ सादर केले.मात्र,तिची परीक्षा 18 मार्च रोजी संपत असल्याने पेपर संपल्यावर मी येते, असे तिने सांगितले.शिक्षणाविषयीची तिची जिद्द यामधून स्पष्ट झाली.
18 मार्च 2026 रोजी पीडिता तिच्या लहान बहिणी व वडिलांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आली. त्या वेळी दोन्ही बहिणी भीती आणि तणावाखाली होत्या.त्यांनी घरी परतण्यास नकार दिल्यानंतर तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधण्यात आला.त्यानंतर जिल्हा महिला बालविकास चाइल्ड लाईनचे अमर भोसले,पुनम पाटील, श्री.चव्हाण तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रतिनिधी प्रियंका जाधव व एक महिला प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले.
पीडित मुलींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांना बालकल्याण समिती सदस्य ॲड.दिपाली जहागिरदार यांच्या समोर हजर करण्यात आले.तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन बालकल्याण समितीने दोन्ही मुलींना शक्ती सदन,बालाजी नगर,शेकापूर रोड,धाराशिव येथे पाठविण्याचा आदेश दिला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या संवेदनशील आणि तत्पर हस्तक्षेपामुळे दोन अज्ञान मुलींना त्रासातून मुक्तता मिळाली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटक आणि अज्ञान बालकांना कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय,धाराशिव यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.