धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषदेला पाणीपुरवठ्यासाठी दरमहा येणाऱ्या भरमसाठ वीज बिलाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता ठोस पावले उचलण्यात येत आहेत. उजनी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरावी लागत असल्याने नगरपरिषदेला लाखो रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वीज तोडणीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वात महत्त्वाकांक्षी सोलार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव शहराजवळ असलेल्या वरवंटी शिवारात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या सुमारे 15 एकर जमिनीवर 5 मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही जमीन नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या जागेची प्राथमिक पाहणी करण्यात आली असून सोलार प्रकल्प उभारणीसाठी ती उपयुक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पाहणी दौऱ्यात पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, बांधकाम सभापती अभिजीत काकडे, नगरसेवक पंकज भोसले, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, वरवंटी गावचे तलाठी तसेच वारी सोलार प्रकल्प भगवान शेजुळ यांच्या सह इतर कंपनीचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. हा सोलार प्रकल्प कार्यान्वित झाल्यास धाराशिव नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.
