धाराशिव (प्रतिनिधी)- डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी नोंदणी करणे शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यकांमार्फत 31 मार्च 2026 पूर्वी ई-पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल क्रॉप सर्वे योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी नोंदणी सध्या सुरू आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत,कर्जसुविधा व विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.

रब्बी हंगामाची सुरुवात 10 डिसेंबर 2025 पासून झाली असून,शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी 24 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात आली होती.त्यानंतर सहाय्यक स्तरावरून 25 जानेवारी 2026 पासून ई-पीक पाहणी नोंदणी सुरू करण्यात आली.या नोंदणीसाठीची मुदत पूर्वी 10 मार्च 2026 पर्यंत होती.मात्र,जिल्ह्यातील एकूण अपेक्षित क्षेत्रापैकी केवळ 24.66 टक्के नोंदणी पूर्ण झाल्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत.यामुळे कोणताही शेतकरी शासकीय लाभांपासून वंचित राहू नये,यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत दि.31 मार्च 2026 पर्यंत वाढविली आहे.

ई-पीक पाहणीच्या नोंदीवरच पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई,शेतकरी कर्ज व अनुदान व इतर कृषी योजनांचा लाभ निश्चित होतो.म्हणून ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी अद्याप झालेली नाही,त्यांनी आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकांच्या मदतीने  मोबाईल ॲपच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पूर्वी अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत असून या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे.शासनाची ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून, भविष्यातील सर्व शासकीय लाभ ई-पीक पाहणीच्या नोंदीवर आधारित राहणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सहाय्यकांच्या मदतीने आपली ई-पीक पाहणी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 
Top