तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील शंभर वर्षांत हिंदू समाजाच्या संघटनासाठी सातत्याने कार्य केले असून, सर्वसामान्य नागरिकांनी ‘पंच परिवर्तन’ अंगीकारल्यास आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, असे प्रतिपादन सेवा भारतीचे अखिल भारतीय सह संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी केले.
येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात आयोजित इंद्रायणी हिंदू संमेलनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. पांडुरंग रेड्डी महाराज उपस्थित होते.
प्रारंभी संस्कार भारती देवगिरी प्रांताचे सह महामंत्री डॉ. सतीश महामुनी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत गणेश पुजारी यांनी केले. संमेलनाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आपल्या भाषणात विजयराव पुराणिक यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या लहान-लहान कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. ‘पंच परिवर्तन’ समजून घेऊन त्याचा अंगीकार केल्यास समाजातील अनेक समस्या सहज सोडवता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदू संस्कृती अत्यंत प्राचीन असून जगातील 55 देशांमध्ये तिचे दर्शन घडते, असे नमूद करत पुढील पिढ्यांपर्यंत या संस्कृतीचा वारसा पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिकूल परिस्थितीतही हिंदू समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले असून, डॉ. हेडगेवार यांनी ज्या उदात्त भावनेने संघाची स्थापना केली, तो विचार आजही तितकाच उपयुक्त आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ह.भ.प. पांडुरंग रेड्डी महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गणेश पुजारी, उपाध्यक्ष महेश कांबळे, कोषाध्यक्ष औदुंबर वाघे, संरक्षक बालाजी नरवाडे, सचिव रितेश कवडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संस्कार भारतीचे जिल्हा पदाधिकारी लक्ष्मीकांत सुलाखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघाचे पदाधिकारी श्रीकांत कावरे यांनी केले.
