तुळजापूर (प्रतिनिधी)- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या त्या देशांकडे द्राक्ष निर्यात काही प्रमाणात मंदावली असली तरी तुळजापूर तालुक्यातील द्राक्षबागायतदारांवर त्याचा मोठा परिणाम झालेला नाही. कारण रशिया आणि युरोपीय देशांमध्ये दर्जेदार द्राक्षांना मोठी मागणी वाढल्याने तुळजापूरचा माल चांगल्या दराने विकला जात आहे.

तुळजापूर तालुक्यात सुमारे तीन ते साडेतीन हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा असून येथील हवामान आणि जमीन द्राक्षासाठी अत्यंत पोषक मानली जाते. तांबडी, थोडी माती असलेली काळसर मुरमाड आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्याने या भागाला आता द्राक्षांचा ‌‘गोल्डन बेल्ट‌’ म्हणून ओळख मिळू लागली आहे. माळुंब्रा, मसला आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड झाली असून पूर्वी सालगडी म्हणून काम करणारे अनेक शेतकरी आज स्वतःचे द्राक्षबागायतदार झाले आहेत.


उत्पादन घटले; पण दर्जा उत्कृष्ट

यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने द्राक्ष उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र द्राक्षांचा दर्जा अत्यंत चांगला असल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे संचालक महादेव वडणे यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या रशिया व युरोपीय देशांत 110 ते 115 रुपये किलो दराने माल विकला जात आहे. देशातील उच्चवर्गीय बाजारातही द्राक्षांना 80 ते 90 रुपये किलो दर मिळत आहे. तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षांना 160 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


द्राक्षबाग उभारणीला मोठा खर्च

द्राक्षबाग उभारण्यासाठी सुरुवातीला सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर दरवर्षी तीन ते चार लाख रुपये द्राक्ष पिकवण्यासाठी लागतात. त्यामुळे एकरी 10 ते 15 टन उत्पादन मिळाल्यासच द्राक्षबाग आर्थिकदृष्ट्या परवडते. माधवराव वडणे हे 2000 सालापासून द्राक्ष उत्पादन घेत असून सध्या त्यांच्या सुमारे 26 एकरांवर द्राक्षबाग आहे.


कमी दरात माल विकू नका : आवाहन

गेल्या दहा वर्षांत द्राक्षांना समाधानकारक भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करताना वडणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की,“आखाती युद्धाच्या भीतीने द्राक्ष उत्पादकांनी आपला माल कमी दरात विकू नये. युरोपमध्ये मागणी वाढत असल्याने चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.”तुळजाभवानीच्या धार्मिक ओळखीबरोबरच आता तुळजापूर तालुक्याची ओळख द्राक्षांचा ‌‘गोल्डन बेल्ट‌’ म्हणूनही निर्माण होत असून येथील दर्जेदार द्राक्षे जगभर निर्यात होत आहेत.

 
Top