तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरातील अतिक्रमणाचा सर्वाधिक त्रास भाविकांना होत असल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमा यात्रा सोहळ्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते आणि मंदिरासमोरील भाग अतिक्रमण मुक्त करण्याचे नियोजन असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, तीर्थक्षेत्राचा विकास केवळ इमारती उभारून होत नाही, तर सुविधा, स्वच्छता आणि पर्यावरण संतुलन राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुळजापूर शहरातील अनधिकृत भक्तनिवासांमुळे निर्माण होणारा कचरा हा नगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फुटपाथ समतल (लेव्हल) केल्याने आता दुकानमालकांना ठरावीक मर्यादेतच व्यवसाय करावा लागणार असून, फुटपाथ वापरासाठी स्वतंत्र कर आकारला जाणार आहे.
मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी स्टील रेलिंग उभारण्याचे नियोजन, अमंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांवर गेट बसवून दुचाकी प्रवेश बंद, जुन्या बसस्थानकाच्या मागील जागेत फक्त दुचाकी वाहनतळ उभारणार,‘हरित तुळजापूर’ योजना राबवून पर्यावरण संतुलनावर भर, विकासकामांमध्ये ठेकेदारांना झाडे लावणे व जोपासणे बंधनकारक करणार, चिट्ठी पुजारी व्यवसायावर नियंत्रण आणण्याचे नियोजन असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले की, तुळजापूर हे शक्तिपीठ असल्याने काशी, उज्जैन आणि शेगावप्रमाणे शिस्तबद्ध आणि अतिक्रमणमुक्त शहर उभारण्याचा संकल्प आहे. सर्व दुकाने एकाच रेषेत असावीत, यासाठी नियोजन केले जात आहे.
दरम्यान, हुतात्मा चौक ते किसान चौकी हा महत्त्वाचा रस्ता श्री क्षेत्र विकास आराखड्यातून पूर्ण करण्याचे नियोजन असून, विकास प्राधिकरणाचा निधी संपल्याने नव्या आराखड्यातून काम हाती घेतले जाणार आहे. यात्रेनंतर प्रशासनाची कडक अंमलबजावणी सुरू होणार का? तुळजापूरकरांचे लक्ष आता पुढील कारवाईकडे लागले आहे.