भूम (प्रतिनिधी)- नगर परिषदेच्या गाळेधारक व्यापाऱ्यांवर आकारण्यात येणाऱ्या 24 टक्के वार्षिक व्याजदराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, हा जाचक निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी पालिका मुख्याधिकारी व उपविभागीय दंड अधिकारी कार्यालय यांच्या कडे व्यापारी वर्गाने निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील सुमारे 90 टक्के व्यापारी पालिकेच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करतात. सध्याच्या अस्थिर आर्थिक परिस्थितीत व्यापार मंदावल्याने व्यापाऱ्यांवर बँक कर्ज, कॅश क्रेडिट व इतर देणींचा ताण वाढलेला आहे. महत्वाची बाब म्हणजे सदरील कर्जाला देखील 24 टक्के व्याज नाही. परंतु पालिकेचे गाळे भाडे थकीत होताच या भाड्यावर 24 टक्के व्याज आकारले जात असल्याने. ही घटना अत्यंत अन्यायकारक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान व्यापाऱ्यांनी कोटी रुपयांहून अधिक अनामत रक्कम पालिकेकडे जमा केली असतानाही. त्यावर कोणताही व्याज परतावा मिळत नाही. मात्र भाडे थकीत झाल्यास मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जाते. ही रक्कम ही पालिकेची थोडी होत नाही. व्यापाऱ्यांचे गाळे भाडे 50 हजार रुपयांच्या आसपास जाताच थकबाकीवर ही तब्बल 50 हजारच व्याज आकारले जात असल्याचे समोर येत आहे. तशा नोटीसा ही पालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांना धाडण्यात आल्या आहे. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण
व्यवसाय करून जीवनाचा गाडा चालवायचा की पालिका चालवायची ? असा सवाल व्यापारी बांधव उपस्थित करत आज पालिका प्रशासनाकडे धाव घेतली आहे. व निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनात तातडीने निर्णय न झाल्यास व्यवसाय बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे,उपाध्यक्ष नारायण बोत्रे,दीपक खराडे,जयेंद्र महिंदरगे,अरविंद शिंदे,अमोल तुळशी,रवींद्र दुगम यांच्या सह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
