तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवासी आणि श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त श्रीकांत लाहोटी यांनी आज देवीच्या चरणी 1 लाख 92 हजार 872 रुपयांची देणगी अर्पण केली. आपल्या अखंड श्रद्धा व भक्तिभावातून त्यांनी ही देणगी अर्पण करत श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेतले.
श्रीकांत लाहोटी हे गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला देणगी देत असून, ते दरवर्षी कधी वस्तू स्वरूपात तर कधी रोख रकमेच्या स्वरूपात देणगी देऊन श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी आपली सेवा बजावत असतात. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जयसिंग पाटील यांनी श्रीकांत लाहोटी यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी महेंद्र आदमाने, तेजस कऱ्हाळे, विश्वास कदम तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
