धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांसह इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे फेब्रुवारी अखेर थकीत 139 कोटी 69 लाख व चालू महिन्याचे 29 कोटी 75 लाख अशा एकत्रीत 169 कोटी 44 लाख रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वसुली मोहीम मार्च अखेरीस अधिक आक्रमक केली आहे. थकबाकीदार वीजग्राहक रडारवर असून वारंवार सुचना देवूनही दाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा थेट मीटर काढून खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. वीज खंडित केल्यानंतर कुणी परस्पर जोडल्यास महावितरणतर्फे थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणने केले आहे. 

जिल्ह्यातील लघूदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडील वीजबिल थकबाकी वसुलीसाठी संपूर्ण जिल्ह्यात महावितरणचे सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी भर उन्हात दारोदार फीरत आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. मात्र जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्यात येत आहे. काल पर्यंत 1 हजार 824 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट होत आहे. नॉन स्मार्ट मीटर असेल, तर ते थेट काढून आणले जात आहे. थकबाकी भरल्यावरच नवीन स्मार्ट मीटरने वीजपुरवठा जोडण्यात येत आहे. गेल्या चोवीस दिवसात धाराशिव मंडळातील थकबाकीदार ग्राहकांनी 26 कोटी 76 लाख रूपयांच्या बिलांचा भरणा केला आहे. हे प्रमाण चालू बिलाच्या केवळ 89 टक्केच असून मार्च महिन्यातील निर्धारीत लक्ष्य गाठण्यास अद्याप 2 कोटी 99 लाख रूपये येत्या सहा दिवसात वसुल करण्याची कसरत महावितरणला करावी लागणार आहे. या वसुलीत मागील थकबाकीला स्पर्शही झालेला नाही.


सर्वाधिक थकबाकी कळंब उपविभागात

धाराशिव विभागाची मागील थकबाकी 88 कोटी 24 लाख असून चालू महिन्याचे 19 कोटी 17 लाख वसुल करावयाचे आहेत. यापैकी कालपर्यंत केवळ 16 कोटी 69 लाख वसूल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक थकबाकी ही कळंब उपविभागातील आहे. 25 कोटी 47 लाख थकबाकी असून चालू महिन्याचे 4 कोटी 24 लाख वसुल करावयाचे आहेत. यापैकी काल पर्यंत 3 कोटी 85 लाख वसूल झालेले आहेत. तर परंडा उपविभागातील ग्राहकांकडे थकबाकीसह 17 कोटी 19 लाख थकबाकी असून 1 कोटी 64 लाख वसूल करण्यात आले आहेत. भूम उपविभागातही चालूबिलासह एकूण थकबाकी 16 कोटी 17 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 2 कोटी 14 लाख वसूल झाले आहेत. धाराशिव शहर उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 10 कोटी 21 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 4 कोटी 94 लाख वसूल झाले आहेत. धाराशिव ग्रामीण उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 7 कोटी 71 लाखांची आहे. यापैकी 1 कोटी 56 लाख वसूल झाले आहेत. तेर उपविभागातही चालूबिलासह एकूण थकबाकी 13 कोटी 51 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 2 कोटी 24 लाख वसूल झाले आहेत. वाशी उपविभागातही चालूबिलासह एकूण थकबाकी 12 कोटी 92 लाखांची थकबाकी आहे. यापैकी केवळ 92 लाख वसूल झाले आहेत.

तूळजापूर विभागातील लघूदाब वर्गवारीतील ग्राहकांकडे चालू महिन्याच्या बीलांसह 51 कोटी 44 लाख थकबाकी असून 10 कोटी 8 लाख काल पर्यंत वसूल करण्यात आले आहेत. लोहारा उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 5 कोटी 21 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 1 कोटी 48 लाख वसूल झाले आहेत. नळदुर्ग उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 15 कोटी 11 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 1 कोटी 48 लाख वसूल झाले आहेत. उमरगा उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 18 कोटी 13 लाखांची थकबाकी आहे. यापैकी 4 कोटी 27 लाख वसूल झाले आहेत. तर तूळजापूर उपविभागात चालूबिलासह एकूण थकबाकी 23 कोटी 57 लाखांची थकबाकी आहे. यापैकी कालपर्यंत 2 कोटी 84 लाख वसूल झाले आहेत.

वीजबील वसुलीसाठी विभागीय कर्मचाऱ्यांसोबतच धाराशिव मंडळ तसेच लातूर परिमंडल कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारीही थकबाकीदारांचे दार ठोठावत आहेत. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले हे सातत्याने वसुलीवर लक्ष ठेवून आहेत. जास्त थकबाकी असलेल्या व वसुली कमी असलेल्या उपविभागाला प्रत्यक्ष भेट देऊन वसुलीचा आढावा घेत आहेत. यावेळी अधीक्षक अभियंता संजय आडे हे सुध्दा वारंवार बैठका घेवून व प्रत्यक्ष उपविभागीय क्षेत्रात वसुलीसाठी फीरत आहेत. धाराशिव विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र रडे, तसेच तूळजापूर विभागाचे कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे यांच्यासह तांत्रिक कर्मचारी, लेखा विभाग व मानव संसाधन विभागाचे अधिकारी कर्मचारी वसुलीसाठी फीरत आहेत. मार्च अखेरीस केवळ सहा दिवस राहिल्याने युद्धपातळीवर वसुलीचे काम करा, अशा सूचना मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी दिल्या आहेत.

 
Top