भूम (प्रतिनिधी)- दि. 25 मार्च रोजी नगर परिषदेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक चंद्रमणी गायकवाड यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना पत्र देऊन त्यांनी ही मागणी अधिकृतपणे मांडली आहे.
नगर परिषदेत होणाऱ्या सर्वसाधारण सभांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांची माहिती पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.
लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांना अचूक व विश्वासार्ह माहिती देण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे पत्रकारांना सभेत प्रवेश नाकारल्यास पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दि. 25 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश देऊन लोकशाही मूल्यांचे पालन करावे, अशी मागणी नगरसेवक चंद्रमणी गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे.