भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालयातील बीएससी द्वितीय वर्षाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील पहिल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या खवा क्लस्टरला, भूम येथे शैक्षणिक क्षेत्रीय भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना सौरऊर्जेच्या प्रत्यक्ष वापराची सखोल माहिती मिळाली.

या सौर प्रकल्पाचे संचालक विनोद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सोलर प्लांटची कार्यपद्धती समजून घेतली. सौरऊर्जेपासून वीज कशी निर्माण केली जाते, ती ऊर्जा साठवून तिचा खवा उत्पादन प्रक्रियेत कसा उपयोग केला जातो, याबाबत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण करून विविध प्रश्न विचारले. या संवादातून विद्यार्थ्यांची विषयावरील समज अधिक दृढ झाली.

या क्षेत्रीय भेटीमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष जीवनात कशा वापरल्या जातात, याचा अनुभव मिळाला. तसेच नूतनीकरणक्षम ऊर्जेचे महत्त्व आणि त्याचे औद्योगिक उपयोग याबाबत जागरूकता निर्माण झाली. या प्रसंगी भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. डी. राठोड, प्रा. ए. ए. बारकुल, डॉ. एस. एम. अलगुंडे तसेच   विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरली.


 
Top