धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात प्रथमच कालिपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम नवमी व चैत्र नवरात्री निमित्त भव्य देवी गोंधळ उत्सव व शिव तांडव स्तोत्र पठणाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी लेडीज क्लब मैदानावर अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या निनादात पारंपरिक मिरवणुकीने करण्यात आली.
भव्य रॅलीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसेच समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून कार्यस्थळी आगमन करण्यात आले. यावेळी पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
त्यानंतर कालीचरण महाराज यांच्या ओजस्वी शिव तांडव स्तोत्र पठणाने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. हा भव्य धार्मिक सोहळा रुपामाता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. लोकशाहीर देवानंद माळी व पृथ्वीराज माळी यांच्या टीमने विधिवत पूजा साकारत देवीचा गोंधळ उत्सव पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने साजरा केला. यावेळी संगीताच्या तालावर अनेक भाविक भक्तांनी ठेका धरला.
या कार्यक्रमास आयोजक तथा रुपामाता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड, माजी जि.प. अध्यक्ष सुधाकर गुंड, रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड, श्री क्षेत्र काळ भैरवनाथ संस्थान सोनारी चे मुख्य विश्वस्त संजय महाराज पुजारी, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, ह.भ.प. ॲड. पांडुरंग महाराज लोमटे, ह.भ.प. अडसूळ महाराज इटकूरकर, भाजपा नेते रामदास कोळगे यांच्यासह रुपामाता परिवारातील सदस्य, आराधी मंडळ, विविध सामाजिक व गणेश मंडळांचे पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता व श्रद्धा वृद्धिंगत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस व प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विशेष उल्लेख
रुपामाता परिवाराबद्दल गौरवोद्गार काढताना महाराज म्हणाले की, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये व्यंकट गुंड यांचा मोलाचा वाटा आहे. मागील पाच पिढ्यांपासून या कुटुंबात कट्टर हिंदुत्वाची परंपरा जोपासली गेली असून, त्यांना लहानपणापासूनच हिंदुत्वाचे बाळकडू मिळाले आहे. हे संस्कार रुपाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली दिले गेले. कारसेवेत रुपाबाई व गुंड परिवाराचा मोठा सहभाग राहिला असून, त्या काळात रुपाबाई यांना जेलमध्येही जावे लागले होते. आज जे राममंदिर आपण अभिमानाने पाहत आहोत, ते अशा कट्टर हिंदुत्ववादी आणि त्यागी कार्यकर्त्यांच्या योगदानामुळेच साकार झाले आहे.
