धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून विविध सहकारी संस्थांची स्थापना करून प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. ते धाराशिव येथे सहकार भारतीच्या वतीने आयोजित सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्याभारतीचे क्षेत्रिय मंत्री श्री शेषाद्री डांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक एडवोकेट रवींद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री पाचपोर पुढे म्हणाले की सहकार भारतीच्या वतीने रिझर्व बँकेला सहकारी बँकांच्या लेखापरीक्षण ,कर्ज वसुली रेशो तसेच बँकिंग व्यवस्थापनातील अनेक महत्त्वांच्या बदलांची शिफारस करण्यात आली आहे. सहकार भारतीच्या सूचनेवरून देशभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आता थेट रिझर्व बँकेचे नियंत्रणाखाली आलेल्या आहेत. छोट्या पतसंस्था, मल्टीस्टेट आणि दूध उत्पादक संस्था, मत्स्य, गृहनिर्माण यासारख्या सहकारी संस्थांसोबत आता सहकारी क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी सहकार भारतीने अनेक नव्या सहकारी संस्था नोंदवण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढवून सर्वसामान्य नागरिक, महिला आणि सर्व आर्थिक स्तरातील नागरिकांचे जीवनमान उंचावत देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडया राज्यात सहकारातील अनेक संस्थांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करून महाराष्ट्रात सुरू झालेली सहकार चळवळ देशाला आर्थिक दिशा देत असल्याचे श्री पाचपोर यावेळी म्हणाले.

सोलापूर जनता सहकारी बँक संचालक मंडळाने संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल विजयी संचालकांचे अभिनंदन करून श्री पाचपोर यांनी बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने बँकेच्या कामासाठी भरपूर वेळ द्यावा,कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कार्यपद्धती विकसित करावी, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेषाद्री डांगे यांनी केले त्यात त्यांनी धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जनता बँकेचे संचालक श्री हर्षल डंबळ हे बिनविरोध निवडून आणण्यासाठी जसे प्रयत्न झाले तसेच सोलापूर जिल्ह्यातूनही व्हायला हवे होते, बँकेच्या जुन्या सभासदांना मतदान प्रक्रियेत शेअर्स रक्कम वाढवून सहभागी करून घ्यायला हवे,धाराशिव जिल्ह्यात बँकेच्या शाखा वाढाव्यात अशा अपेक्षा नूतन संचालक मंडळाकडून व्यक्त केल्या.

जिल्हा संघचालक एडवोकेट रवींद्र कदम यांनी नूतन संचालक मंडळात धाराशिवचे संचालक डॉक्टर हर्षल डंबळ यांच्यावर द्याल ती जबाबदारी धाराशिव जिल्ह्याचा सन्मान वाढवणारी असल्याचे सांगून जिल्ह्यात बँकेच्या माध्यमातून नव उद्योजक, नव ठेवीदार यांना जोडून घेण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

 यावेळी नूतन संचालक आणि विद्यमान अध्यक्ष श्री सुनील पेंडसे आणि सौ चंद्रिका चौहाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवीदास पाठक यांनी केले तर आभार श्री अविनाश लोमटे यांनी मानले.प्रारंभी सहकार भारतीचे संस्थापक स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बँकेचे सभासद ,जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व संस्था संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top