धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या विविध कामगार कल्याण योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली काही दलाल व मध्यस्थ लाभार्थ्यांकडून तब्बल 50 टक्के रक्कम घेत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध कामगार योजनांचा लाभ खऱ्या गरजू कामगारांना मिळावा हा शासनाचा उद्देश असताना काही एजंट व मध्यस्थ योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे एजंट कामगारांचे अर्ज करून देण्याच्या नावाखाली योजनेत मिळणाऱ्या आर्थिक साह्यापैकी सुमारे 50 टक्के रक्कम कमिशन म्हणून घेत असल्याची माहिती समोर येत असल्याने गरीब कामगारांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या योजनांचा मूळ उद्देशच धोक्यात येत असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित दलाल व मध्यस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कठेर कारवाई करण्यात यावी, तसेच कामगारांना कोणत्याही दलालांशिवाय योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर, पृथ्वीराज मुळे, सहीद पटेल, अल्लानूर पठाण त्यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
