धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्राहक म्हणून वस्तू खरेदी करताना त्यावरील किंमत,दर्जा आणि एक्सपायरी तारीख तपासणे आवश्यक असून, ग्राहक जागरूक असेल तर त्याची फसवणूक होणार नाही,असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य नितीन अग्रवाल व श्रीमती वैशाली बोराडे,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य शरद वडगावकर,अजित बागडे,आशिष बाबर,अनिल पाटील तसेच वीज तक्रार निवारण मंचच्या सदस्या मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक करताना जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावेळी मेधा कुलकर्णी, पुनम तापडिया आणि पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान सभागृहाबाहेर विविध विभागांचे स्टॉल लावून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली. याचवेळी मान्यवरांच्या हस्ते संगीता गायकवाड, अंबर देशमाने, सय्यद गिलानी, नारायण कांबळे, बालाजी शेलार, संगीता, चांद अब्दुल शेख, शेरीपा नवाब शेख, काझी शमशाद आणि छाया चौधरी यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साखळे यांनी केले.

 
Top