धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‌‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण‌’ उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी कराटेचे प्रात्यक्षिक सादर करत आत्मरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमास डायट कॉलेज धाराशिवच्या उपप्राचार्या शोभा मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याचे आणि आत्मरक्षेचे प्रशिक्षण कसे उपयोगी पडते याबाबत सांगितले. तसेच “वाचाल तर वाचाल” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला बोरी गावचे सरपंच तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 
Top