धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनामार्फत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाणारी सारथी शिष्यवृत्ती योजना अचानक बंद करण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.
याबाबत डॉ. पाटील यांच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सारथी शिष्यवृत्ती योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठा आधार मिळत होता. अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या मदतीने विविध स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पुढे येत होते. मात्र शासनाने ही योजना अचानक बंद केल्याने हजारो विद्यार्थ्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पुढे सांगितले की, शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत होत असून अनेकांना शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण जात आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून तात्काळ या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि शैक्षणिक प्रवास सुरळीत राहण्यासाठी सारथी शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्याबाबत शासन स्तरावर तातडीने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
