परंडा (प्रतिनिधी)- पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाच्या अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंग ठाकूर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तसेच शिबिराची सुरुवात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून करण्यात आली.

या प्रशिक्षण महाअभियानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये योग, प्राणायाम व सूर्यनमस्कार शिबिर तसेच आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता दर्शविली. याप्रसंगी भाजपा उपजिल्हाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, बौद्धिक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सूर्यवंशी, भाजपा परंडा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे व शहर प्रमुख उमाकांत गोरे , तानाजी पाटील, जयदेव गोफणे, गौतम लटके सर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या योग सत्रामध्ये योग, प्राणायाम व सूर्यनमस्काराचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैलीबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ.आनंद मोरे (एम.डी. आयुर्वेद मेडिसिन) योगशिक्षक यांनी प्रात्यक्षिकासह केले. त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक ताण कमी होतो व कार्यक्षमता वाढते, असे प्रतिपादन केले. तसेच निरोगी कार्यकर्ता हा सशक्त संघटनेचा पाया असून आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी असून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले. या प्रशिक्षण महाअभियानामुळे कार्यकर्त्यांचा सर्वांगीण विकास होऊन समाजसेवा व राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला अधिक बळ मिळेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

 
Top