धाराशिव (प्रतिनिधी)- हास्याचे फवारे उडविणारी मिश्किल शैली तर कधी काळजाला भिडणाऱ्या, क्षणभर स्तब्ध करणाऱ्या कवितांचे सादरीकरण करीत मराठवाड्यातील कविंनी कविसंमेलनाचा मंच गाजवला. कविसंमेलनास साहित्यिरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी प्रा.जिजा शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले.

प्रा. जिजा शिंदे यांनी 

किती लगडलेली असते माती युगानयुगे

किती अनुपम सोहळा अनुभवला असतो

गाव शिवारातील मातीने

ही मातीचे महत्व सांगणारी कविता सादर केली.

दिलीप चौधरी यांनी

हसण्यानं आयुष्य वाढत असतं

पण काही लोकांना कळत नसतं

तनवणे काही होत नसतं

मग खाल्लेलं पचत नसतं

ही विनोदी शैलीतील कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.

प्रज्वल भालेराव यांनी

साहेब एसी मध्ये बसणारी पोरं दंगली मध्ये आत जात नाहीत

जातात तुमची आमची

अशी चल दंगल समजून घेऊ ही समाजभान देणारी कविता सादर केली.

प्रा. सुलक्षणा सोनवणे यांनी

सोसून ताप सारा जगतात बायका

सुर्यासमान तळपत असतात बायका

ही महिलांच्या व्यथा मांडणारी गझल सादर केली.

भावना चौधरी यांनी

बाप ही कविता सादर करून वडिलांचे महत्त्व विशद केले.

कविसंमेलनात भावना चौधरी, मनीषा पोतदार, युसुफ सय्यद, दिलीप चौधरी, प्रज्वल भालेराव (धाराशिव), अनुपमा भंडारी, सुलक्षणा सोनवणे, सुनिता मोरे, दयानंद बिराजदार (लातूर),  साईनाथ रहाटकर (लोहा), शिवराज लोखंडे (बिलोली), रघुवीर पतंगे, विजया पतंगे, गोडाती  काळे  (हिंगोली),  आत्माराम जाधव (गंगाखेड), राजकुमार यल्लावाड, गोविंद पाठक (परळी), अंजली यादव-चाळक (केज), वासुदेव उगले, वैशाली फोके (जालना), दीपक नागरे (गंगापूर), अकिल पठाण (छत्रपती संभाजीनगर) बी. सुरभी आदींनी सहभाग नोंदवून कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन  प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार नारायण खैरे यांनी मानले.


 
Top