धाराशिव (प्रतिनिधी)- भारताची जनगणना 2027 ही डिजिटल पद्धतीने होणारी असून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे जनगणनेचे काम काळजीपूर्वक करावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज (दि.26) जनगणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जनगणना 2027 प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जनगणना संचालनालय,मुंबईचे उपसंचालक तथा प्रशिक्षक किरण गुरव,सहनिरीक्षक पवन गोडे,जिल्हा समन्वयक चेतन प्रकाश,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर तसेच सहाय्यक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अंकित सिंह उपस्थित होते.
खडसे यांनी जनगणनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. मूलभूत सुविधांचे अचूक नियोजन करता येते आणि लोकसंख्येनुसार निधीचे न्याय्य वाटप शक्य होते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे ही जबाबदारी आहे.
उपसंचालक किरण गुरव यांनी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, पहिल्या टप्प्यात प्रगणक कुटुंब प्रमुखाकडून 33 प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करणार असून प्रत्येक कुटुंबाने आपल्या सोयी-सुविधांची माहिती देणे आवश्यक आहे. सहनिरीक्षक पवन गोडे यांनी सांगितले की,जनगणना 2027 चा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार असून या कालावधीत घरयादी व घरगणना केली जाईल.दुसरा टप्पा 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान पार पडणार आहे.
