धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह परिसरात असलेल्या कब्रस्तानात मोठमोठी झाडेझुडपे वाढलेले आहेत. तसेच या परिसरामध्ये स्वच्छता देखील केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कब्रस्तानमध्ये अंत्यविधी कार्यक्रम करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्या झाडांची तोडणी करण्यासह वृक्षांची छाटणी करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अजहर चाँद मुजावर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.9 मार्च रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील हजरत ख्वाजा संशोधन गाजी रहे. परिसरात असलेले कब्रस्तान सर्वात मोठे व महत्त्वाचे आहे. या कब्रस्तान परीसरामध्ये मोठी व छोटी काटेरी व इतर झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे या कब्रस्तानमध्ये नागरिकांना जाता येत नाही. तसेच हा दर्गाह प्रसिद्ध असून शहरासह इतर ठिकाणाहून देखील भाविक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. त्यामुळे या कब्रस्तानातील झाडांची आवश्यकतेनुसार करणे व वृक्षांची छाटणी करणे आवश्यक आहे. त्यातच पवित्र रमजान महिना सुरू असून ईदचा सण देखील या दर्गाह परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, अस्वच्छता असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देऊन या कब्रस्तान परिसरातील झाडांची छाटणी करून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मुजावर यांनी केली आहे.


 
Top