भुम (प्रतिनिधी)- भूम शहरातील कसबा भागातील श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव मिती चैत्र शु. 1 ते 9 (दि. 19 ते 27 मार्च 2026) या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार असून शहर व परिसरातील भाविकांसाठी दररोज भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवात दररोज सायंकाळी भजन कार्यक्रम होणार असून विविध भजनी मंडळे, महिला भजनी मंडळे तसेच स्थानिक कलाकार यांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये केशवराज भजनी मंडळ, जानुदेवी महिला भजनी मंडळ, श्रीकृष्ण मंदिर भजनी मंडळ, गुरुसांगळी भजनी मंडळ, सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, चौंडेश्वरी भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, विश्वनाथ भजनी मंडळ आदी मंडळांचा सहभाग राहणार आहे. उत्सवाच्या काळात दररोज रात्री प्रवचन व कीर्तन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ह.भ.प. श्री. श्रीधरजी (बाबा) महाराज सामनगावकर, ह.भ.प. श्री. एकनाथ महाराज कुलकर्णी (पुणे), ह.भ.प. श्री. राजेंद्र देशपांडे (मुंबई), ह.भ.प. श्री. कृष्णा महाराज साकरीकर (बीड) आदी कीर्तनकारांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे. तसेच विविध संतांच्या जीवनावर आधारित कीर्तनातून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाणार आहे.

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सकाळी धार्मिक विधी, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दररोज सकाळी 10 ते सायं. 4 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध मान्यवर संत-महंत व कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत. उत्सवाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती (कसबा), भूम यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top