धाराशिव (प्रतिनिधी)- पदवी शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना सर्वोच्च पगाराच्या रोजगारसंधी सहज उपलब्ध होतात, असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थिनी आश्लेषा अशोक मंडाळे यांनी केले.
महाविद्यालयातर्फे आयोजित “मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या संधी“ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानात त्या बोलत होत्या. आपल्या यशोगाथेचा वृत्तान्त सांगताना आश्लेषा म्हणाल्या, “मी महिंद्रा अँड महिंद्रा या प्रतिष्ठित कंपनीत मुलाखतीसाठी उपस्थित होते. तेथे स्पर्धा करणाऱ्या 100 उमेदवारांमधून माझी सर्वोच्च पगारासह निवड सहजपणे झाली. यामागील प्रमुख कारण म्हणजे महाविद्यालय स्तरावरच कटिया, युजीएनएक्स सारखे प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून करून घेतले होते. पदवी शिक्षण घेत असतानाच कौशल्य विकास केल्यामुळेच कंपनीने माझी निवड केली. सध्या मी 15 लाख रुपयांच्या वार्षिक मानधनावर नोकरी करत आहे.“ याप्रसंगी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “शहरी भागातील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा उपलब्ध असतात, त्यापेक्षा एकही सुविधा आपल्याकडे कमी नाही. महाविद्यालयाचे अकॅडमीक डीन व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते यांनी मार्गदर्शन केले.
