धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज दिनांक 28 मार्च 2026 पूर्वी निकाली काढावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,धाराशिव श्री.सचिन कवले यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता अशा विविध योजनांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावरून दिनांक 01 जुलै 2025 पासून सुरू करण्यात आली आहे.महाडीबीटी प्रणालीवरील डॅशबोर्डच्या पाहणीनुसार सन 2025-26 साठी एकूण 7432 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले असून त्यापैकी 1254 अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
या संदर्भात महाविद्यालयांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या असतानाही संबंधित प्राचार्यांनी अद्याप अर्जांची पडताळणी करून ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नाहीत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन प्राप्त अर्जांची शासन निर्णयातील निकषांनुसार सखोल छाननी करून पात्र अर्ज दिनांक 28 मार्च 2026 पूर्वी समाज कल्याण कार्यालयाकडे अग्रेषित करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विहित मुदतीत अर्ज निकाली न काढल्यास अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो.अशा परिस्थितीत त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी यांची राहील,याची गांभीर्याने नोंद घ्यावी,असेही श्री.सचिन कवले यांनी कळविले आहे.