धाराशिव (प्रतिनिधी)- आज दिनांक 07.03.2026 रोजी धाराशिव तालुक्यातील केशेगाव या मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 01 अंतर्गत शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरील अभियानाचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील मॅडम यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख साहेब यांची विशेष उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमास केशेगाव मंडळातील सन्मानीय पंचायत समिती सदस्य आणि सर्व सरपंच तसेच तहसिलदार मा.डॉ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार महादेव शिंदे व विशाखा बलकवडे हेअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंचावरून सामाजिक अर्थसहाय योजना संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मा.अप्पर जिल्हाधिकारी यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन व केशेगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थींच्या प्राथना समूहगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 01 अंतर्गत महसूल विभागाचे 10 स्टॉल, ग्रामविकास विभागाचे 02 स्टॉल, उमेद अंतर्गत महिला बचत गटाचा 01 स्टॉल, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचा आयुष्यमान भारत स्टॉल तपासणीचा स्टॉल आणि तसेच रजिस्ट्री ऑफिस भूमी अभिलेख कृषी विभाग या सगळ्यांचे स्टॉल कार्यक्रम स्थळी होते. एकूण तालुकास्तरीय सर्व विभागांचे स्टॉल होते. प्रस्तुत शिबीरामध्ये महसूल विभागामार्फत 1) जिवंत 7/12 मोहीम अंतर्गत 7/12 वाचन, 2) सामाजिक अर्थसहाय्य योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, 3) विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक दाखल्यांसाठी अर्ज(आवश्यक कागदपत्रांसह) स्वीकारणे, 4) मंजूर फेरफार प्रकरणांतील 7/12, फेरफार उतारा व खाते उतारा वाटप, 5) 7/12 मधील त्रुटी संदर्भात अर्ज स्वीकारणे, 6) डिजीटल 7/12 ला कायदेशीर वैधताबाबत जनजागृती करणे, 7) भोगवटदार वर्ग 2 जमीनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये परावर्तित करणे, 8) तुकडेबंदी कायद्याविरुद्ध दि. 15/11/1965 ते 15/11/2024 पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या जमीनीचे खरेदी विक्री व्यवहार नियमानुकूल करणे आणि 8) अकृषक तरतूदी संदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन करणे इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या. त्याचप्रमाणे शिबीरस्थळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत् आरोग्य तपासणी कॅम्प सुद्धा घेण्यात आला.
प्रसंगी नवीन शासन निर्णय यांचे वाचन करण्यात आले सर्व संबंधितांचे अर्ज स्वीकारण्यात आले सगळ्यांच्या समस्या वैयक्तिकरित्या जाणून घेण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 01 अभियानामधील दिलेल्या 15 मुद्यांचे अनुषंगाने सर्वांना माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले व सर्व संबंधितांचे अर्ज वैयक्तिकरित्या समजून घेऊन त्यावर पुढील कार्यवाही अनुसरण्याचे अनुषंगाने शेरा नोंदविण्यात आले. तसेच केशेगाव मंडळातील प्रशासकीय अर्जांचा जास्तीत जास्त महिनाभरामध्ये संपूर्ण निपटारा करावा अशा सूचना तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिल्या. या पहिल्याच मंडळ शिबिराला सर्व नागरिक सर्व महिलावर्ग सर्व शेतकरी बांधव सर्व लोकप्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरस्थळी मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
