धाराशिव (प्रतिनिधी)- थकीत वीजबिलाची वसुली टाळण्यासाठी किंवा वेळ मारून नेण्यासाठी जाणीवपूर्वक न वटणारे (बाऊन्स होणारे) धनादेश देणाऱ्या वीज ग्राहकांसाठी आता महावितरणने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. लातूर परिमंडलात फेब्रुवारी महिन्यात तब्बल 28 लाख 77 हजार 919 रुपयांचे 98 धनादेश तांत्रिक किंवा आर्थिक कारणांमुळे अनादरीत (बाऊन्स) झाल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहे. त्यामुळे वीजग्राहकांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
महावितरणने या गंभीर प्रकरणांची दखल घेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 च्या कलम 138 अन्वये कायदेशीर कारवाईची मालिका सुरू केली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार, कोणत्याही बँक खात्यातून जारी केलेला धनादेश अपुऱ्या निधीअभावी किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे न वटल्यास, महावितरणकडून संबंधित ग्राहकाला 30 दिवसांच्या आत रितसर नोटीस बजावण्यात येईल. या नोटीसची मुदत संपल्यानंतरही 15 दिवसांच्या आत जर संबंधित ग्राहकाने रकमेचा भरणा केला नाही, तर 30 दिवसांच्या आत त्या ग्राहकाविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या कायद्यानुसार दोषी ठरल्यास ग्राहकास दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंडाची, अथवा दोन्ही शिक्षा होण्याचे कायदेशीर प्रावधान आहे.
याप्रमाणे अनादरीत धनादेश
बीड, धाराशिव, लातूर या तीन मंडळात अनादरीत धनादेशाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम अडकून पडली आहे. बीड महावितरण मंडळामध्ये 38 धनादेश न वटल्यामुळे 11 लाख 62 हजार 130 रूपये रक्कम थकीत राहिली आहे. तर धाराशिव महावितरण मंडळात 17 धनादेश न वटल्यामुळे 3 लाख 38 हजार 889 रूपये थकीत राहिले आहेत. तर लातूर महावितरण मंडळात 43 धनादेश न वटल्यामुळे 13 लाख 76 हजार 900 रूपये थकीत राहिले आहेत.