धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस ठाण्याच्या आवारात बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चावा घेऊन गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिस अधिकाऱ्याला चावा घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25 मार्च 2026) दुपारी परंडा पोलिस ठाण्यात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस ठाणे परंडा येथील फिर्यादी शिवाजी बबन राऊत (वय 39) हे आपल्या सहकाऱ्यांसह नियमित शासकीय कामकाज करत असताना आरोपी अभिमान दिगंबर काळे, फुलाबाई अभिमान काळे, अनिषा अभिमान काळे आणि दिलीप अभिमान काळे (सर्व रा. देवगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन शिवीगाळ करत गोंधळ घातला. यावेळी “तुझी वर्दी घालवितो” अशी धमकी देत मोठ्याने आरडा-ओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला. तसेच एका आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजी राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 296, 224, 221, 118(1), 3(5) तसेच 110, 112, 117 मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.