भूम (प्रतिनिधी)-  दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत तसेच सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 25 मार्च) रोजी साळुंके मंगल कार्यालय, परंडा येथे तालुक्यातील 36 शाळांतील 150 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास परंडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सूर्यभानजी हाके, सेवा सहयोग फाउंडेशनचे सोशल मीडिया प्रमुख अनिकेत गमरे, धाराशिव जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परंडा तालुकाध्यक्ष ॲड. अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल काशिद, तसेच फाउंडेशनचे प्रतिनिधी श्रीराम केसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत, दुरच्या वस्तीवरून शाळेत पायी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींचा सायकलीमुळे वेळ वाचणार आहे. या वेळेचा उपयोग विद्यार्थिनींनी अभ्यासासाठी व आपल्या गुणवत्तावाढीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. गट शिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी पुढील उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सायकली मिळाल्याने विद्यार्थिनी व पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. गेल्या वर्षीही या संस्थांच्या माध्यमातून परंडा तालुक्यात 150 सायकलींचे वाटप करण्यात आले होते. यंदा भूम तालुक्यात 125, कळंब येथे 125 व परंडा तालुक्यात 150 अशा 400 सायकलींचे वाटप करण्यात आले असून, मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक शंकर पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळसाहेब घोगरे यांनी मानले.


 
Top