धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय परिचारिका महाविद्यालय आणि जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त वतीने जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी टीबीमुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान होते,उपाध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर उपस्थित होते.प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ यांच्यासह डॉ.विनय कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ.डुमणे (मेडिसिन विभाग प्रमुख), डॉ.अभिजीत बनसोडे (जिल्हा क्षयरोग अधिकारी), डॉ. रमजान अली (वैद्यकीय अधिकारी), डॉ.शेख खाजा (जिल्हा कार्यक्रम समन्वयक) तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक क्षयरोग दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना सांगण्यात आले की,1882 साली रॉबर्ट कोच यांनी याच दिवशी क्षयरोगाच्या जिवाणूचा शोध लावला होता.हा दिवस क्षयरोगाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी समर्पित आहे.क्षयरोग हा गंभीर संसर्गजन्य आजार असून तो मुख्यत्वे फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि योग्य वेळी उपचार न घेतल्यास जीवघेणा ठरू शकतो.टीबी मुक्त पंचायत कार्यक्रम सन 2023 पासून राबविण्यात येत असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सन 2023 मध्ये 71 ग्रामपंचायती ब्रॉन्झ श्रेणीसाठी पात्र ठरल्या होत्या. सन 2024 मध्ये 50 सिल्वर व 330 ब्रॉन्झ अशा एकूण 280 ग्रामपंचायती पात्र ठरल्या.तर सन 2025 मध्ये 42 गोल्ड,247 सिल्वर व 143 ब्रॉन्झ अशा एकूण 432 ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. तालुकानिहाय पाहता भूम 55, धाराशिव 73, कळंब  58, लोहारा 39, उमरगा  72,परांडा 35, तुळजापूर 76 आणि वाशी 24 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शाळांमध्ये विविध उपक्रम, रॅली, पथनाट्य, गटसभा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा यांचा समावेश होता. तसेच सर्व आरोग्य केंद्रांमध्ये व ग्रामपंचायतींतर्गत क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले, आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आणि टीबी चॅम्पियन तसेच निक्षय मित्रांचा सन्मान करण्यात आला.

यावर्षीचे घोषवाक्य “होय! आपण क्षयरोगाचा (टीबीचा) अंत करू शकतो, भारताच्या नेतृत्वाखाली, जनभागीदारीच्या बळावर” असे असून, या घोषवाक्याच्या माध्यमातून समाजाच्या सक्रिय सहभागातून टीबी निर्मूलनाचा संदेश देण्यात आला.


 
Top