धाराशिव (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील भगतवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून संबंधितांकडून वसुली करावी असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. मात्र आदेश देऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संबंधितावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे कारवाई न केल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मनोबल वाढून पुन्हा नव्याने भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत संबंधितावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा दि.26 फेब्रुवारीपासून जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा बलभीम इर्ले व सुभाष वाघमोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.20 फेब्रुवारी रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उमरगा तालुक्यातील भगतवाडी, कोळेवाडी व चिरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भगतवाडी येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालय मंजूर होते. ते गावालगत किंवा बाहेरील बाजूस बांधणी अपेक्षित होते. या संदर्भात कोणालाही न विचारता मनमानीपणे ते चक्क जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बांधलेले आहे. ते शौचालय बांधण्याची परवानगी कोणी दिली ? त्यामुळे त्याचा सार्वजनिकरित्या वापर करता येत नाही. तर गावामध्ये गटार बांधली गेली त्याचे अर्धवटच काम केले असून ती किती मीटर लांबीमध्ये बांधायचे होते किंवा त्यासाठी किती बजेटची तरतूद करण्यात आली ? याची चौकशी करण्यात यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या म्हणून शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढले व विहिरी खोदल्या. मात्र, रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी एकाही शेतकऱ्याचे कुठलेही बिल काढलेले नाही त्याची चौकशी करावी. तर अटल भूजल स्पर्धेमध्ये भगतवाडी, कोळेवाडी व चिरेवाडी या गावास मिळालेली 20 लाख रुपयांची बक्षीस रक्कम सरपंच व ग्रामसेवक यांनी त्याची मनमानीपणे कुठे उधळपट्टी केली ? त्याची चौकशी करावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाखो रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवले असून ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याच्याखाली गच्चीकरण न करता फक्त डस्ट पसरवून ब्लॉक सेट केलेले असून त्या कामाची चौकशी करावी. गावासाठी खरेदी केलेल्या वस्तू ते दोघे दाखवीत नाहीत. शेतकरी सहलीवर देखील खर्च दाखवले आहेत त्याचीही चौकशी करावी. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2015 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत चक्क 26 लाख 504 रुपये निधी खर्च केला आहे त्याची चौकशी करावी. तसेच दिनांक 9 फेब्रुवारी पासून ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासकाची नेमणूक होणार असल्याचे समजतात सरपंच व ग्रामसेवक यांनी दि.5 व 6 2026 या दोन दिवसांमध्ये 6 लाख 22 हजार 706 रुपये बँकेतून नियमबाह्य काढलेले आहेत. मात्र सामान आणलेले नाही. त्यामुळे त्याची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक या दोन्ही दोषींवर कारवाई करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारवाई करण्यास टाळाटाळ केली तर ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावर बलभीम इर्ले, सुभाष वाघमोडे, भगवान पालमपल्ले, ज्ञानेश्वर पालमपल्ले, वंदना इर्ले व मंगलबाई नंजारे यांच्या सह्या आहेत.
