धाराशिव (प्रतिनिधी)- कविते सारखा साहित्यिक प्रकार हा साहित्यात महत्वाचा मानला गेला आहे. इथे कमी शब्दात भाव अभिव्यक्ती होत असते. कविता म्हणजे अस्तित्वाचे गीत असते. स्वतःच आपल्या जीवनाची राख उडवत जगण्यात एक वेगळाच आनंद असतो. वाचनात सातत्य असले की चिंतन क्षमता वाढते, चिंतन क्षमता वाढली की सृजनशीलता वाढीस लागते आणि सृजनशीलतेतुन साहित्यिक जन्म घेत असतात असे प्रतिपादन डॉ. कैलास अंभुरे यांनी केले.
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी इंग्रजी भाषा विभागांतर्गत नवोदित लेखक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेच्या मान्यतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे मराठवाड्यातील खऱ्या अर्थाने ज्ञान केंद्र असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तरुणांचे नेतृत्व करणारे संवेदनशील कवी रविंद्र केसकर, डॉ.विद्या देशमुख, डॉ विनोदकुमार वायचळ, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा बबन सुर्यवंशी, डॉ.सी.आर.दापके, डॉ केशव क्षीरसागर, प्रा राजा जगताप यांच्या सह सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार डॉ सी आर दापके यांनी मानले.
