धाराशिव (प्रतिनिधी)-  रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथील रसायनशास्त्र विभाग व गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी वैश्विक मार्ग: परदेशात अभ्यास, संशोधन आणि करिअरच्या संधी” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला.

या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नामदेव एस. तोगरे संस्थापक आणि प्रमुख, शैक्षणिक उपक्रम, भारत, पोस्टडॉक्टरल फेलो, पेनसिल्व्हेनिया, यूएसए, यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. आपल्या सविस्तर सादरीकरणात त्यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, संशोधन क्षेत्रातील नवीन प्रवाह, शिष्यवृत्ती योजना, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कौशल्ये व जागतिक करिअरच्या संधी याबाबत अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक माहिती दिली. डॉ. तोगरे यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक नियोजन, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्याच्या पद्धती, संशोधन प्रस्ताव कसा तयार करावा, तसेच संवादकौशल्य व संशोधनवृत्ती विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षण घेण्याबाबत उत्सुकता व आत्मविश्वास निर्माण झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप  देशमुख यांनी आपल्या स्वागतपर मनोगतातून विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवावी, संशोधनाची आवड जोपासावी व नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. पाहुण्यांची ओळख डॉ. संभाजी धुमाळ यांनी तर आभार प्रदर्शन वेबिनारचे संयोजक डॉ. मंगेश भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेबिनारचे आयोजक डॉ. गोविंद  साळुंके यांनी केले. आयोजन समितीमध्ये प्रा. एस. जे. खोचरे, डॉ. व्ही. ए. गायकवाड व डॉ. एस. टी. धुमाळ यांनी सहकार्य केले. या वेबिनारला विज्ञान शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

 
Top