तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील दीपक नगर तांडा येथील ग्रामपंचायतीकडून सन 2022 ते 2025 या कालावधीतील प्रोसीडिंग नक्कल, कृती आराखडा व ग्रामसभेच्या इतिवृत्तांच्या प्रती देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत राठोड राजपाल काशिनाथ यांनी मा. गटविकास अधिकारी वर्ग1, पंचायत समिती तुळजापूर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कागदपत्रांसाठी मागील एक महिन्यापासून वारंवार लेखी अर्ज करूनही सरपंच व ग्रामसेवक कोणताही ठोस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागणीप्रमाणे अर्ज दाखल करूनही आजपर्यंत एकही कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
तसेच ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसून महिन्यातून केवळ एकदाच येतात, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे गावातील नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायत कामकाजात पारदर्शकता नसल्याची भावना व्यक्त करत संबंधित अधिकारी व सरपंच यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, तसेच मागणी केलेली सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणाकडे पंचायत समिती प्रशासन कशा प्रकारे दखल घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
