धाराशिव (प्रतिनिधी)- गंभीर आजारांनी त्रस्त आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात उपशामक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपशामक सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे.अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय धाराशिव,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून ही रुग्णसेवा आयोजित करण्यात आली आहे.समुपदेशनाद्वारे रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

जिल्हा रुग्णालयात दहा स्वतंत्र उपशामक काळजी बेडची व्यवस्था करण्यात आली असून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय येथे आठवड्यातून एक दिवस विशेष तज्ज्ञ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे मानसोपचारतज्ज्ञ,फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर यांच्या माध्यमातून उपचार दिले जाणार आहेत.

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना या सेवेचा लाभ दिला जाईल. कर्करोग, हृदयरोग, मेंदूचे आजार, अर्धांगवायु, एड्स तसेच उपचाराने पूर्णपणे बरे न होणाऱ्या आजारांनी त्रस्त रुग्णांना गट अ (गंभीर), गट ब (मध्यम) व गट क (सौम्य) अशा प्रकारे वर्गीकृत केले जाईल. गट अ व ब रुग्णांच्या वर्गीकरणानुसार गृहभेटीद्वारे आवश्यकतेनुसार उपशामक उपचार देण्यात येणार आहेत.

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी घरपोच सेवेचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमार्फत सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि आशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून ही सेवा गावपातळीपर्यंत विस्तारली जाणार आहे.प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी गृहभेटी देऊन तपासणी,औषधोपचार व समुपदेशन करतील.त्यामुळे रुग्णांना वारंवार रुग्णालयात जाण्याचा त्रास कमी होईल. तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही आवश्यक मार्गदर्शन मिळेल.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी की,जिल्ह्यात सुरू होणारी ही उपशामक सेवा गंभीर आजारी रुग्णांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरेल.या रुग्णांना वेदना, मानसिक ताण,नैराश्य,श्वास घेण्यास त्रास व अशक्तपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उपशामक सेवेच्या माध्यमातून आजाराच्या उपचारांसह वेदना नियंत्रण, मानसिक आधार, सामाजिक सेवा आणि आध्यात्मिक समुपदेशन प्रदान करण्यात येईल. तसेच रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.


 
Top