धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध इतिहास शिवशाहीर बिहारीलाल राजपूत यांच्या दमदार पोवाड्याने झाली.
“जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत तसेच जिजाऊ वंदना सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे गायिली.यानंतर शिवशाहीर राणा जोगदंड व त्यांच्या संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला. या कार्यक्रमात शिवचरित्रातील पराक्रम,स्वराज्याची प्रेरणा आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. तसेच शुभम खोत व सहकलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
श्रीपतराव भोसले हायस्कूलचे संगीत शिक्षक महेश पाटील यांनी “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती”, “मल्हार वारी मोतीयांनी द्यावी भरून- नाहीतर देवा जातो मी दुरुन”, “आम्ही अंबेचे गोंधळी”, “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावशाली वर्णन शिवशाहीरांनी पोवाड्यांच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकविले. यामुळे वातावरण भारावून टाकले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा विधी प्राधिकरण सचिव न्या.भाग्यश्री पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उप विभागीय अधिकारी ओंकार देशमुख, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे, कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा कापसे, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

