धाराशिव (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी आणि शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद घडावा या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग,कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ‌‘श्री. तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026‌’ चे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2026 रोजी सैनिक विद्यालय मैदान,नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे होणार आहे. कृषी महोत्सवाचे उद्घाटन प्रताप  सरनाईक, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते होणार असून सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

या कृषी महोत्सवामध्ये एकूण 60 दालने उभारण्यात येणार असून त्यापैकी 35 दालने शासकीय योजना व प्रकल्पांसाठी तर उर्वरित दालने खाजगी संस्थांसाठी असतील. महोत्सवात कृषी प्रदर्शन,परिसंवाद चर्चासत्र,उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन तसेच शेतकरी सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय कृषी विद्यापीठांची दालने, विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्र व प्रक्रिया उद्योगांचे विशेष सादरीकरण आणि परिसंवादही आयोजित करण्यात येणार आहेत.

कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयाने विविध पिकांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोयाबीन,हरभरा,फळबाग लागवड आदी पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत तसेच निर्यातक्षम केळी लागवड तंत्रज्ञान,रेशीम लागवड व्यवस्थापन, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन,कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे ऊस शेती उत्पादन व व्यवस्थापन,आंबा लागवड तंत्रज्ञान व मोहोर व्यवस्थापन इत्यादी विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान,संधी व व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी कृषी महोत्सवास अवश्य भेट द्यावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.

 
Top