कळंब (प्रतिनिधी)- शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. येथील साई मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या हस्ते देवी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार गोपाल तापडिया, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, अनंतराव देशमुख तसेच संस्थेचे अध्यक्ष करसन पटेल उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्षा कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाचे व्यासपीठ आहे.” त्यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या लता यंदे यांनी करत वर्षभर राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. स्नेहसंमेलनाची सुरुवात गणपती गीताने झाली. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, कोळीगीत, ‌‘तितली‌’, ‌‘बिजुरिया‌’, विठ्ठल गीत आदी सादरीकरणांतून विद्यार्थ्यांनी रंगतदार कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन व आभार शुभांगी पालकर व बाळासाहेब मुळे यांनी प्रभावीपणे केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सारिका चव्हाण यांच्या नियोजनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


ओलंपियाडमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव

ओलंपियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गिलडा पलक, रणदिवे आर्या, पाटील स्वराली व वाघमारे प्रणित या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . 


संगीत क्षेत्रातही प्रथम श्रेणी

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई आयोजित परीक्षेत विशेष तबला वादनात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माधव कुलकर्णी तसेच पखवाज वादनात विद्यार्थिनी शिवयोग कडबने यांनी प्रथम श्रेणी मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.


नगराध्यक्षांचे इंग्रजीतील मार्गदर्शन चर्चेत

नगराध्यक्षा कापसे यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन इंग्रजी भाषेत केले. आजवर अनेक नगराध्यक्षांनी पद भूषविले; मात्र विद्यार्थ्यांशी इंग्रजीत संवाद साधण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने उपस्थितांमध्ये याची विशेष चर्चा रंगली. शिक्षण व विकासाच्या दृष्टीने हा सकारात्मक संदेश असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबिका कदम, वैशाली राऊत, आयेशा पठाण, नंदिनी खरबड, सौ. इंगळे, सुप्रिया चव्हाण, आम्रपाली कसबे, जनाबाई थोरात, सारिका चव्हाण, अभंग साक्षी, भारत शिंदे, दामोदर शिंदे, सौ. जोशी, पोपट लोमटे, बसवेश्वर शिंगणापूरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती माने, पवार, सौ. उबाळे, संजीव शेळके, दत्तात्रय ताटे, अशोक पुरी यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक क्षमतांना नवे व्यासपीठ मिळाले असून, कार्यक्रमाने उपस्थित पालक व नागरिकांची मनं जिंकली.


 
Top