धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना रयतेच्या सुखाचा प्रामुख्याने विचार केला. रयतेच्या या स्वराज्यात रयत सुरक्षीत रहावी यासाठी मां साहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी कोणताही भेदभाव न करता या मातीतील अठरापगड जातीतल्या माणसाला जपले आणि योग्य न्याय दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत रयत केंद्रस्थानी होती. असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. विकास सरनाईक यांनी केले.
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय समापनाप्रसंगी प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांना अभ्यासक व्यवस्थापन गुरू म्हणून देखील ओळखतात. कारण युद्ध तोंडावर असताना शेतकरी बांधवांना गैरसोय होऊ नये म्हणून अगोदरच शेतरस्ते तयार करायचे म्हणजे शेतात पिकांचे नुकसान होणार नाही आणि पिक व्यवस्थितपणे आले तर रयत उपाशी रहाणार नाही ही दुरदृष्टी त्यांच्याकडे होती.
यावेळी छत्रपती शिवाजी हायस्कूलची विद्यार्थ्यांनी गौरी माळी हिने देखील आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आठवावा शिवप्रताप या शिर्षकाखाली गुलमोहर भित्तिपत्रिकेचे प्राचार्य डॉ. देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन केले. सदर प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ मंगेश भोसले, कनिष्ठ विभाग प्रमुख बबन सुर्यवंशी, प्रा डॉ. केशव क्षीरसागर,प्रा गोंदकर, प्रा विवेकानंद चव्हाण, प्रा माधव उगिले, सुमेर कांबळे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बालाजी गुंड यांनी केले. तर आभार मनिषा मस्के हिने मानले.
