धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2025-26 या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यस्तरावर एप्रिल 2015 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील कामाचे मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये नव्या रुग्णांचा शोध, रुग्ण सहवासीतांना दिलेली पीईपी (रिफाम्पीसीनची एक मात्रा), डीपीएमआर सेवा,विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तसेच निर्देशांकानुसार काम या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.
या मूल्यमापनात धाराशिव जिल्ह्याला प्रथम,सातारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक देण्यात आला.जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यामुळे धाराशिवची ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या पुरस्कारासाठी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. मारुती रामराव कोरे यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभ 22 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालय,मुंबई येथे पार पडला. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव,राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.बनसोडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलारी, उपजिल्हा रुग्णालय कळंबचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्माधिकारी तसेच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातील कर्मचारी उपस्थित होते.